Thursday, July 28, 2011




इतिहासात गाजलेल्या भुईकोटात शिरवळचा ‘सुभानमंगल’ एकेकाळी अग्रस्थानी होता.नीरा नदीच्या दक्षिण तीरावर असणारा हा बलदंड कोट अनेक संकटाना तोंड देत सुमारे २३६ वर्षे उभा होता.या प्रदीर्घ कालावधीत तो सुमारे २०५ वर्षे मुसलमानी राजसत्तांच्या आधिपत्याखाली होता.विजापूरच्या आदिलशाहीचा शिरवळवर बराच काळ अंमल होता.मियाँ महम्मद रहिमखान हा शिरवळच्या ठाण्याचा अंमलदार म्हणून बराच गाजला. इ.स.१७२० मध्ये सातारच्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी हा कोट पाडला. त्यानंतर नारो शंकर सचिव यांनी पेशव्यांना सिंहगड देऊन त्याच्या मोबदल्यात इ.स.१७५१ मध्ये शिरवळचे ठाणे आपल्या ताब्यात घेतले.पुढे स्वातंत्र्यानंतर संस्थाने भारतात विलीन होईपर्यंत तो भोर संस्थानच्या ताब्यात राहिला.

शिरवळचा कोट शके १४३७ (इ.स.१५१५) मध्ये युवानाम संवत्सरात बांधून पूर्ण झाला.दक्षिणेला शिरवळ गावाचे गावठाण, उत्तरेला नीरा नदी, पूर्वेला मंडादेवी व मांड ओढा आणि पश्चिमेला रामेश्वराचे मंदिर या चतु:सीमेत पूर्वीचा कोट अस्तित्त्वात होता.हैद्राबादच्या निजामाने आपल्या आदिलखान नावाच्या सरदाराला शिरवळच्या नीरा नदीकाठच्या “चित्रबेट” नावाच्या टेकड़ावर कोट बांधण्याचा हुकूम दिला.त्यानुसार इ.स.१४७० मध्ये कोटाचे बांधकाम चालू झाले.उत्तम मळलेल्या पांढर्‍या मातीच्या सहाय्याने कोटाचे बांधकाम झाले.दगडांच्या मोठया तोड़ींच्या मदतीने तटाचे भिंती,बुरुज,चौथरे,महाद्वार बनविण्यात आले.तटाचे बांधकाम बिनघडीव दगडांचे तर बुरुज व महाद्वार घडीव दगडांचे होते.तटाच्या द्वारांना व बुरुजाना संरक्षणासाठी जंबुर्‍या होत्या.कोटात पाणीपुरवठ्यासाठी विहिरी व तलाव होते.तसेच राहण्यासाठी महाल, कोटया अशा अनेक सुविधा एकेकाळी येथे होत्या.पण आता हे सर्व नामशेष झाले आहे.सुभानमंगल कोटाला खंदक होता.आता त्याचा मागमुसही राहिलेला नाही.पण आजही खंदक आळी या नावाने हा परिसर ओळखला जातो।



स्वराज्याचा पहिला रणसंग्राम